माझ्या बाई | माझ्या बाई निबंध |निबंध माझे आवडते शिक्षक

।।   बाई    ।।


    दिवाळी, उन्हाळी  व गणपती, ह्या सुट्यात काय करायचे ह्याचे नियोजन मी केलेले असते.कोणत्या दिवशी काय करायचे हे  ही ठरलेले असते.आपण आपल्या विद्यार्थ्यांनपासून दूर राहणार याची जाणीवही असते.पण गेल्या दहा दिवस मी एका हाकेला मुकली आहे. आणि ती हाक आहे,"बाई"
    शाळेची पायरी चढायला सुरुवात होते ना होते तोच ही हाक ऐकू येते आणि क्षणात माझ्यातली  सामान्य स्त्री ही शिक्षिका होते.घर,संसार, जगरहाट सर्व विसरण्याची ताकद या शब्दात आहे.
     कोणाशी कितीही मोठा वाद होऊ दे,एवढाही मोठा अपमान होऊ दे,किती ही मोठे दु:खणे असू दे,समोर विद्यार्थी बघितले की सारे विसरायला होते. आणि त्यांना घडवायची उर्मी उफाळून येते. नवीन संकल्पना, विचार,आपोआप अभ्यासक्रमात शिरतात. त्यांच्यासंग  तल्लीन झाल्यावर वेळचे घड्याळ कधी पुढे सरकते हेही कळत नाही.
     वाचता न येणाऱ्या विद्यार्थ्यांला हळूहळू वाचता येऊ लागलं की त्याच्या "बाई" या हाकेत मिठास जाणवते. प्रश्न विचारल्यावर बाई मी,बाई मी असं ओरडणाऱ्या हुशार मुलांच्या हाकेत आत्मविश्वास जाणवतो.
तर मस्ती करताना पकडल्यावर
बाई मी नाही, मी नाही, असे ओरडणाऱ्या हाकेतून फसवेपणा लगेच समजतो 
   'बाई ' शब्द तेच पण वर्गातील प्रत्येकाचा आवाज, नाद,लय वेगळी असल्याने कोणी हाक मारली हे बसल्याजागी नजर न टाकता नुसत्या श्रवणाने समजते. व त्यांनी का हाक मारली असावी हेही न सांगता उमजते.
     'बाई' म्हणजे बाबातला 'बा' व आईतला 'ई ' आहे.तुम्हाला बाबा व आईची दोन्ही भूमिका पुर्ण शिक्षिकीपेशात निभवायच्या आहेत हे पाठकबाईने  डी.एडला खूप वेळा सांगितले वाक्य आहे. त्यामुळे ही हाक ऐकताना आपल्या जबाबदारीची जाणीव लगेच होते.
      पालकसभेत वा पालकभेटीला येतात त्यावेळेला बाई,तुम्ही याला समजवा,हा तुमचंच ऐकतो. किंवा हीला जरा मला मदत करायला सांगा. अशा अर्थाची वाक्य ऐकते.तेव्हा मला या बाई शब्दाची ताकद समजते व पालकाचा आपल्यावरील विश्वास
जाणवतो.
     तर अशी ही हाक ,"बाई" अजून किती तरी दिवस ऐकायला मिळणार नाही.तिच्यातल्या गोडवेला, मायेला मी मुकले. आहे. माझ्या मनाची तगमग होत आहे.ती तगमग वाढली तरी चालेल. पण दाटीवाटीत राहणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा कोरोनाचा संसर्ग न घडो.मला 'बाई '  साथ घालणाऱ्या या उगवत्या ता-याना  बंद घरात राहण्याची ताकद येऊ दे.त्याच्या स्वस्थ न बसणाऱ्या वृत्तीला  वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व समजू दे.
     मी लवकर ऐकेल, त्यांची हाक
'बाई'

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post